Popular Posts

Wednesday, January 30, 2013

आधी विचार जन्म घेतात: ... हे आहे सोनिया गांधी यांचे खरे रूप

click here: आधी विचार जन्म घेतात: ... हे आहे सोनिया गांधी यांचे खरे रूप: त्यागाची मूर्ती, गांधी घराण्याची सून सोनिया गांधी यांचे खरे रूप समजून घ्यायचे आहे ?

Wednesday, November 28, 2012

योद्धा सम्राटासारखेच जगले बाळासाहेब..!!

हिंदूहृदयसम्राट, योद्धा संघटक बाळासाहेब ठाकरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली ...

योद्धा सम्राटासारखेच जगले बाळासाहेब


एका व्यंग्यचित्रकारापासून हिंदुहृदयसम्राटापर्यंतचा प्रवास गाठणार्‍या बाळासाहेब ठाकरेंनी आठवणींचा अनंत ठेवा मागे ठेवला आहे. या आठवणी स्वतःच वैशिष्ट्यपूर्ण ठरतील, यात शंकाच नसावी. ते आपल्याच मस्तीत जगत आले. ते जे बोलायचे ते लोक मन लावून ऐकत असत आणि ते जे लिहीत ते आवर्जून वाचत असत. कुणी त्यांच्या मुद्यांशी सहमत असोे अथवा नसो, त्यांनी त्याची कधीच फिकीर केली नाही. राजकीय समझोत्यासाठी वा हवा पाहून भूमिका बदलणार्‍यांप्रमाणे वक्तव्ये करणे त्यांना कधीच मंजूर नव्हते. ते जे म्हणत, ती काळ्या दगडावरची रेघ होऊन जात असे. १९७५ च्या आणिबाणीत त्यांनी इंदिरा गांधींची सशर्थ साथ केली. मात्र, त्यानंतर अयोध्या आंदोलनाशी जुळल्यानंतर प्रखर हिंदुत्वाचे ते इतके पुरस्कर्ते झाले की, लोकांनी त्यांना हिंदुहृदयसम्राट या उपाधीनेच गौरविले.वादग्रस्त बाबरी ढांचा जमीनदोस्त झाल्याबद्दल त्यांनी उगाच नक्राश्रू ढाळले नाहीत. उलट कारसेवकांना सन्मानित करण्याची घोषणा केली. राष्ट्रपतिपदाच्या गेल्या निवडणुकीत मराठी स्वाभिमानाचा मुद्दा उपस्थित करून त्यांनी प्रतिभाताई पाटील यांना पाठिंबा दिला आणि यंदा शालीनता आणि विद्वत्तेच्या मुद्यावरून ते प्रणव मुखर्जी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. हिंदुत्व, राष्ट्रीय सुरक्षा आणि सैनिकांच्या सन्मानाच्या मुद्यावरील त्यांची वक्तव्ये प्रक्षेपणास्त्राप्रमाणे दशदिशांना आदळत आणि संपूर्ण आशिया खंडात त्याचे पडसाद उमटल्याचे बघायला मिळत असे.

पाकिस्तानच्या आतंकवाद्यांना भीती कोणाची वाटत असे, हा प्रश्‍न विचारला तर त्याचे उत्तर निश्‍चितच शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे हेच होते. लाहोरमधील वरिष्ठ संपादक असलेले माझे एक मित्र म्हणाले, हिंदूंची खुजी, धोतर आणि शेंडी तसेच व्यापारी मनोवृत्तीवाली प्रतिमा बाळासाहेबांनी पूर्णतः बदलली आणि त्यांच्यावर हल्ला झाला तर त्याला जबरदस्त ताकदीने प्रत्युत्तरदेखील दिले जाईल, अशा वातावरणाची निर्मिती केली.
काही वर्षांपूर्वी पाञ्चजन्यचा संपादक या नात्याने बांद्रेस्थित त्यांच्या सुप्रसिद्ध मातोश्री या बंगल्यात त्यांची भेट घेण्याचा योग आला. हिंदू संघटनांच्या आजच्या स्थितीबाबत ते अतिशय नाखुष होेते. मुस्लिम मतांच्या भीतिपोटी तडजोड करण्याची मानसिकता बदलली नाही, तर भविष्यात त्याचे मोठे दुष्परिणाम भोगावे लागतील, असे त्यांचे ठाम मत होते. त्यांच्या या शब्दांचा आजही मला विसर पडलेला नाही. ते म्हणायचे, कॉंग्रेससारखे होऊन कॉंग्रेसचा पराभव केला जाऊ शकत नाही. आपले वेगळेपण आणि स्वतंत्र ओळख ठेवूनच आपण विजय मिळवू शकतो. म्हणूनच देशातील कुठल्याही राष्ट्रीय घटनेवरील त्यांचे वक्तव्य आणि सामनामधील संपादकीय आगळेवेगळे आणि सर्वाधिक धारदार राहात असे. त्यांच्या शब्दात ताकद होती. कारण ते जे बोलत, ते करून दाखवण्याची हिंमत आणि सामर्थ्य त्यांच्यात होते. तथापि, त्यांच्यावर अति मराठीभक्त, मुस्लिम विरोधी आणि प्रांतीयतावादी असे ठपके ठेवून सेक्युलर जमातीच्या लोकांनी त्यांच्या कर्तृत्वावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले होते. पण बाळासाहेबांच्या प्रगाढ मैत्रीचे विराट वलय प्रांत, भाषा आणि धर्माच्या सीमारेषांपलीकडचे होते. दोस्तीची नाती टिकवून ठेवण्यासाठी ते जगाच्या कोणत्याही टोकापर्यंत आणि कोणत्याही सीमा उल्लंघून जाण्यास तयार असत. अमिताभ बच्चनपासून शाहरुख खानपर्यंत आणि संजय दत्तपासून सलमान खानपर्यंत सारेच त्यांच्या दिलदारपणाची खात्री देऊ शकतील. केवळ भारताबद्दल अगाध निष्ठा आणि सन्मान याच एकमेव निकषावर त्यांच्याशी मैत्री शक्य होती. भारतापुढे प्रांत आणि संप्रदाय याचे स्थान गौण होते. प्रारंभीच्या काळात महाराष्ट्रात शिवसेना अमराठींविरुद्ध उभी ठाकली होती, हे सर्वविदित आहे. पण बाळासाहेबांनी त्याबाबत महाराष्ट्राची संस्कृती आणि पारंपरिक वातावरणाच्या जपणुकीचे सामाजिक संदर्भ देऊन देशवासीयांची समजूत काढली. निरनिराळ्या प्रांतांचे वैशिष्ट्य आणि जमिनीच्या सुगंधाचे रक्षण हाच त्यांच्या आंदोलनांचा मूळ हेतू होता.
ज्या सेक्युलर मंडळींना काश्मिरी हिंदूंचे अस्तित्व मान्य नाही, ज्यांना अरुंधती रॉय, गिलानी, यासीन मलिक यांच्या शब्दात सेक्युलरवादाची व्याख्या परिभाषित करण्याची गरज भासते आणि ज्यांना कसाब आणि अफजल गुरूच्या मानवाधिकारांची चिंता वाटते, तेच त्यांना कट्टर हिंदुत्ववादी आणि पाकिस्तानविरोधी संबोधत असत. या सेक्युलर तालिबान्यांच्या कुठल्याही आरोपांची बाळासाहेबांनी कधी तमा बाळगली नाही. हिंदुत्वासाठी लढणार्‍या संघटनांमध्ये फूट पडू नये आणि हिंदूंच्या मुद्यांवर लढा देताना तडजोडीची, गुडघेटेकू मानसिकता स्वीकारली जाऊ नये, याकडे त्यांचा कटाक्ष असायचा. पाकिस्तान आमच्यावर सातत्याने हल्ले करीत राहील, आतंकवाद्यांना आश्रय देऊन त्यांना प्रोत्साहन देत राहील आणि आपण त्यांच्यासोबत क्रिकेट खेळत राहू, यात कुठले आले देशप्रेम? देशभक्तीची ही व्याख्या त्यांना मुळीच मान्य नव्हती आणि त्यांच्या या प्रश्‍नाचे उत्तरही कुणाजवळ नव्हते. भारतीय लोकांनी मार खायचा आणि आनंदाने पाकिस्तानी लोकांसोबत मनोरंजनाच्या कव्वाल्या गाव्या, हे त्यांनी तहहयात मान्य केले नाही.
त्यांनी आपला मार्ग आणि नशीब हे स्वतःच निश्‍चित केले. हिंदूंच्या मतांची विभागणी होऊ नये आणि त्याचा लाभ कॉंग्रेसला मिळू नये, याच एकमेव चिंतेपायी त्यांनी भारतीय जनता पार्टीशी अतिशय दृढ असे मैत्री संबंध प्रस्थापित केले होते. त्यामुळेच हे राजकीय समीकरण युती कशी असावी, याचे एकमेवाद्वितीय उदाहरण होऊन बसले आहे. दोन्ही पक्षांमध्ये मतभेद होते, कार्यक्रमांबाबत शंभर टक्के मतैक्य कधी झाले नाही, तथापि त्यातून कधी मनभेद आणि युती तोडण्यापर्यंतची मजल गाठली गेली नाही. त्यामुळेच अनेक प्रकारचे अडथळे पार करून संसदेपासून विधानसभेपर्यंत ही युती अबाध्य राहून आपला प्रभाव कायम ठेवू शकली.
जीवनाच्या संध्याकाळी बाळासाहेबांना राज ठाकरे यांनी वेगळी चूल मांडल्यामुळे मोठा मानसिक धक्काही बसला. पण याकडे त्यांनी केवळ कॉंग्रेसची एक खेळी म्हणून पाहिले. राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिवसेनेच्या मतपेटीला धक्का पोहोचवलाच आहे. अखेरच्या दिवसात बाळासाहेबांचा स्वभाव थोडा शांत आणि सर्वसमावेशकही होत गेला. ते बरेच आध्यात्मिकही झाले होते. त्यांचे वडील महाराष्ट्राचे प्रख्यात प्रबोधनकार आणि थोर पत्रकार म्हणून प्रसिद्ध होते. बाळासाहेबांना धर्मपत्नी मीनाताई यांच्या निधनानंतर आयुष्यातील पहिला मोठा मानसिक धक्का बसला होता. तेव्हापासून त्यांनी स्वतःला एकांतातील चिंतनात गुंतवून घेतले होते. तथापि, सामनामधून त्यांचे संपादकीय आणि प्रक्षेपणास्त्रांसारखी प्रहार करणारी मते-मतांतरे प्रसिद्ध होतच होती. त्यांच्या फटकार्‍यातून ना सहयोगी पक्षांचे नेते बचावले ना अन्य राजकीय पक्षांचे नेते.
सावरकरांनीही त्यांच्या कार्यकाळात प्रखर हिंदुत्वाचे विचार कुठल्याही तडजोडींचा मुलामा न देता, परखडपणे आपल्या लेखणीने मांडले होते. बाळासाहेबांनीही छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करीत, त्यांचेच अनुकरण करत अखेरपर्यंत हिंदुत्वाची तत्त्वे आग्रहाने मांडली. त्यांच्या शब्दांनी आणि लेखणीने देशातील लाखो लोक प्रभावित झाले, हे कुणीच नाकारू शकणार नाही. ते एखाद्या ढाण्या वाघासारखे जगले आणि जीवनाचा भरपूर आनंद घेऊन योद्धा सम्राटासारखा या मोहमयी दुनियेचा त्याग केला. त्यांची कमतरता वास्तवात भरून निघणे अशक्यकोटीतील आहे.
तरुण विजय
(लेखक राज्यसभा सदस्य आहेत)
अनुवाद : चारुदत्त कहू

Tuesday, November 27, 2012

प्रवास लोकशाही ते हुकूमशाही


प्रवास- लोकशाही ते हुकूमशाही


बऱ्याच दिवस चाललेल्या शेतकरी संघटनांच्या आंदोलनाने बरेच प्रश्न देखील निर्माण केले आहेत. त्यातच भारत कृषिप्रधान देश असूनदेखील शेतकऱ्यांबद्दलचा सरकारला असलेला आदर तमाम देशातील जनतेने पहिला व पाहत आहेत. मग तो आंदोलन चिरडून टाकण्यासाठी केलेला लाठीमार असो वा गोळीबार असो. हे सरकार आता लोकशाहीकडून हुकूमशाही कडे वाटचाल करताना दिसते आहे. आपले लाडके व्यक्तिमत्व असलेले बाबा म्हणजेच मुख्यमंत्री काही दिवसांपूर्वी म्हणाले- “उसाचे दर व सरकारचा काही संबंध नाही”. मग शेतीला लागणाऱ्या सर्व रासायनिक खतांवरील शेतकऱ्यांना मिळणारे सरकारी अनुदान का काढून टाकण्यात आले? तसेच दिवसेंदिवस वाढणारे डीझेल व पेट्रोल वरील दर यामुळे उत्पादन खर्चात झालेली वाढ, खतांच्या भरमसाट किमती या सारख्याच कित्येक गोष्टी व त्यांच्याखाली नेहमी भरडला जाणाऱ्या शेतकऱ्याने उसाला दर वाढवून मागितला तर बिनसले कुठे? यात भरीस भर म्हणून बारामती न्यायालयाने खा.राजू शेट्टी यांना केलेली बारामती, इंदापूर, दौंड तालुका प्रवेश बंदी हे देखील सरकारच्या हुकुमशाही चे ऐक उदाहरणच आहे. यामुळेच सरकारवर असलेला सर्वसामान्य जनतेचा व शेतकरी बांधवांचा विश्वास कमी होतो आहे.

Tuesday, October 23, 2012

विजयादशमी



आश्विन शुद्ध दशमी हा दिवस विजयादशमी किंवा दसरा म्हणून पाळला जातो. देवीच्या घटांची स्थापना आश्विन शुद्ध प्रतिपदेला केल्यानंतर देवीचे नवरात्र पाळले जाते आणि दहाव्या दिवशी विजयादशमी साजरा करण्यात येतो.


दसरा सण मोठा नाही आनंदाला तोटा
दसरा हा शब्द दश म्हणजे दहा यावरून आला असावा. त्याचा अर्थ दहावा दिवस असा आहे. नवरात्रात घटाच्या आजूबाजूला पेरलेले... 

`दसरा' साजरा करण्यामागील शास्त्र व इतिहास
 

अ. कृषीविषयक लोकोत्सव 

            `दसरा' हा प्रारंभी एक कृषीविषयक लोकोत्सव होता. पावसाळयात पेरलेले पहिले पीक घरात आल्यावेळी शेतकरी हा उत्सव साजरा करत. नवरात्रात घटस्थापनेच्या दिवशी घटाखालच्या स्थंडिलावर नऊ धान्यांची पेरणी करतात व दसर्‍याच्या दिवशी त्या धान्यांचे वाढलेले अंकुर उपटून देवाला वहातात. कित्येक ठिकाणी शेतातल्या भाताच्या लोंब्या तोडून आणून त्या प्रवेशद्वारावर तोरणासारख्या बांधतात. ही प्रथादेखील या सणाचे कृषीविषयक स्वरूपच व्यक्‍त करते. पुढे याच सणाला धार्मिक स्वरूप दिले गेले आणि इतिहासकाळात तो एक राजकीय स्वरूपाचा सण ठरला.

आ. विजयादशमी 

             रामाचा पूर्वज रघु या अयोध्याधिशाने विश्‍वजीत यज्ञ केला. सर्व संपत्तीचे दान केले. नंतर तो एका पर्णकुटीत राहिला. कौत्स तिथे आला. त्याला १४ कोटी सुवर्णमुद्रा हव्या असतात. रघु कुबेरावर आक्रमणाला सिद्ध होतो. कुबेर आपटा व शमी वृक्षांवर सुवर्णाचा वर्षाव करतो. कौत्स फक्‍त १४ कोटी सुवर्णमुद्रा घेतो. बाकीचे सुवर्ण प्रजाजन नेतात. - गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (घनगर्जित)


(सोने लुटण्याच्या प्रथेमागची कथा-विजयादशमीच्या दिवशी आपट्याची पाने सोने म्हणून लुटण्याविषयी काही कथा आहेत. त्यावरून ही प्रथा कशी अस्तित्वात आली असावी यावर उजेड पडतो. रामायणाच्या पंचम सर्गांत रघुवंशामध्ये दिलेली कथा अशी- पूर्वी पैठणमध्ये देवदत्त नावाच्या एका ब्राह्मणास कौत्स नावाचा मुलगा होता. तो सुशील होता. मौजीबंधनानंतर तो भडोच नावाच्या शहरी वरतंतू ऋ‍षीच्या घरी विद्यार्जनासाठी गेला. काही काळ लोटल्यावर कौत्स सर्व शास्त्रांत पारंगत झाला, गुरूला गुरुदक्षिणा देऊन त्यांच्या ऋणातून कसे मुक्त व्हावे असा विचार तो करू लागला.गुरूंचा निरोप घेताना त्याने अत्यंत कृतज्ञतापूर्वक त्याचे आभार मानून आपल्या आवडीचा काही पदार्थ असल्यास तो सांगावा, म्हणजे गुरुदक्षिणेदाखल तो आणून देईन असे त्याला सांगिलते. गुरूने उत्तर दिले:- कौत्सा, दक्षिणार्थ विद्या शिकविणे हे अनुचित कर्म आहे. शिष्य विद्वान् झालेला पाहून गुरुस जो आनंद प्राप्त होतो तीच गुरुदक्षिणा होय. परंतु कौत्सास गुरूच्या ऋणात राहणे न आवडून त्याने आग्रह धरला व पुन: पुन: मी तुम्हाला काय दक्षिणा देऊ? असे विचारू लागला. तेव्हा वरतंतू ऋषी म्हणाले, मी दक्षिणा घ्यावी असा तुझा आग्रहच असेल तर तुला शिकविलेल्या प्रत्येक विद्येबद्दल एक कोटी याप्रमाणे चौदा कोटी मुद्रा व त्याही एकाडूनच आणून दे. ही अट कौत्साने मान्य करून आपल्या विद्येच्या धीरावर तो तेथून बाहेर पडला, परंतु चौदा कोटी मुद्रा व त्याही एकाच इसमाकडून मिळविणे काही सोपे काम नव्हे हे त्याला लवकरच समजले. रघुराजा मोठा उदार व विद्वानांस आश्रय देणारा आहे असे त्याच्या कानावर येताच तो त्याच्याकडे गेला, परंतु त्या वेळी रघुराजाने विश्वजित् यज्ञ करून ब्राह्मणांकडून सर्व द्रव्यभंडार लुटविले होते, यामुळे त्यालाही अत्यंत गरीबी आलेली होती. कौत्साने त्याच्या एकंदर स्थितीचे सूक्ष्म निरीक्षण केल्यावर आपली इच्छा येथे सफल होणार नाही असे वाटून त्याला दु:ख झाले. रघुराजाने आपल्या द्वारी आलेल्या विद्वान् ब्राह्मणाचा योग्य सत्कार केला व त्याच्या आगमनाचे कारण विचारले. कौत्साने कारण सांगितले व तो पुढे म्हणाला, 'राजा, तुला प्राप्त झालेल्या स्थितीत माझी मनीषा सफल होण्याचा रंग दिसत नाही. तथापि त्याजबद्दल खंत वाटू न देता मला दुसरा दाता शोधून काढण्यासाठी जाऊ दे. हे कौत्साचे भाषण ऐकून राजा हसला. त्याने चौदा कोटी सुवर्ण मुद्रा तीन दिवसात देतो असे कौत्सास आश्वासन देऊन त्याला आपल्या घरी ठेवून घेतले. थकलेली बाकी वसूल करण्यासाठी इंद्राबरोबर लढण्याची तयारी चालविली. ही गोष्ट इंद्रास समजताच त्याने अयोध्या नगराबाहेर आपट्याच्या व शमीच्या झाडांवर कुबेराकडून सुवर्णमुद्रांचा वर्षांव करविला. रघुराजाने त्या सर्व कौत्सास दिल्या. त्याने त्या वरतंतू ऋषिपुढे ठेवून त्यांचा स्वीकार करण्याविषयी विनंती केली.परंतु त्याने फक्त १४ कोटी मुद्रा ठेवून घेऊन बाकीच्या कौत्यसास परत दिल्या. त्या त्याने रघुरराजास आणून दिल्या, पण तोही त्या घेईना. शेवटी त्याच आपट्याच्या व शमीच्या झाडाखाली त्या मुद्रांचा ढिग करून त्याने लोकांस त्या नेण्यास सांगितले. लोकांनी अनायासे श्रीमंत होण्याची ही संधी साधून त्या नगरीच्या सीमेबाहेर असलेल्या त्या झाडांची पूजा केली, सोने यथेच्छ लुटले व एकमेकांस देऊन आनंद व्यक्त केला. हा दिवस विजयादशमीचा होता. त्या वेळेपासून या झाडांची पूजा करून सुवर्णमुद्रांच्या ऐवजी या झाडांची पाने लुटण्याचा प्रघात प्रचारात आला.)


इ. श्रीराम व हनुमान तत्त्वे आणि क्षात्रवृत्ती जागृत करणारा दसरा

             दसर्‍याच्या दिवशी ब्रह्मांडात श्रीरामतत्त्वाच्या तारक, तर हनुमानतत्त्वाच्या मारक लहरींचे 

एकत्रिकीकरण झालेले असते. दसरा या तिथीला जिवाचा क्षात्रभाव जागृत होतो. या क्षात्रभावातूनच जिवावर 
क्षात्रवृत्तीचा संस्कार होत असतो. . दसर्‍याला श्रीराम व हनुमान यांचे स्मरण केल्याने जिवात दास्यभक्‍ती 
निर्माण होऊन श्रीरामाचे आशीर्वादरूपी तत्त्व मिळण्यास मदत होते. दसर्‍याच्या दिवशी ब्रह्मांडात लाल 
(शक्‍तीरूपी) व तांबूस (दास्यभावातून निर्माण झालेल्या आशीर्वादरूपी लहरी) रंगांच्या स्प्रिंगसारख्या लहरी 
कार्यरत अवस्थेत असतात. या लहरींमुळे जिवाची आत्मशक्‍ती जागृत होण्यास मदत होऊन जिवाच्या 
नेतृत्वगुणामध्ये वाढ होते. 
          दस-याच्या दिवशी देवीने महिषासुराचा वध केला भगवान रामचंद्राने रावणावर मात करण्यासाठी ह्याच दिवशी प्रस्थान केले ह्याच दिवशी रघुराजाला घाबरुन कुबेराने शमी वृक्षावर सोन्याच्या मोहरांचा पाऊस पाडला वनवास संपल्यावर पांडवांनी या वृक्षाच्या ढोलीत ठेवून दिलेली शस्त्रास्त्रे पुन्हा धारण केली यामुळे शूर लोक या दिवशी आपल्या शस्त्रास्त्रांची पूजा करतात तर व्यावसायिक लोक आपापल्या कामाची 

हत्यारे यंत्रसामुग्री यांची पूजा करतात या
दिवशी संध्याकाळी गावाबाहेर सीमोल्लंघनास जातात तेथे शमीच्या व आपट्याच्या झाडांची पूजा
करुन सूवर्णमोहरांचे प्रतिक म्हणून शमीची पाने एकमेकांस दिली जातात.


श्रीरामाने याच दिवशी लंकाधिपती रावणाबरोबर युद्ध करण्यासाठी दक्षिणेस कूच केले. त्याला यशही मिळाले. त्याच्या विजयाबद्दल आनंदोत्सव म्हणूनही हा सण साजरा केला जातो. राजपूत सरदारही याच मुहूर्तावर लढाईवर निघत असत. मराठ्यांच्या स्वार्‍याही याच दिवसांपासून सुरू होत. पेशवे आपल्या आश्रित संस्थानिकास दसर्‍याच्या दिवशी दरबार भरवून मानाचा पोशाख देत. ब्रिटिश अधिकार्‍यांनीही काही काळ ही प्रथा सुरू ठेवली होती.
 
दसरा शेतकर्‍यांच्या दृष्टीनेही महत्त्वाचा आहे. कारण नवरात्रात नऊ दिवसात उगवलेली रोपे शेवटच्या दिवशी दसर्‍यास वाहतात. तसेच शेतकरीही शेतात तयार झालेल्या भाताच्या लोंब्या आणून त्याची पूजा करतात. प्रवेशद्वारावरही टांगतात. याशिवाय घरातील विविध भांड्यांना धान्याची कणसे बांधण्याची प्रथा कोकणात आहे. बंगालमध्येही अशाच प्रकारचा एक विधी होतो. तेथे स्त्रिया गवताची पेंढी धान्याच्या कोठारास बांधतात. त्याला बावन्न पोटी असे म्हणतात. म्हणजे हे धान्य बावन्न पट होऊ दे. 
त्याचप्रमाणे भारत हा कृषिप्रधान देश आहे. त्यामुळे धान्याला व ते पिकवणार्‍या शेतकर्‍याला मोठा मान आहे. धान्य उदंड प्रमाणात यावे यासाठी ईश्वराला साकडे घालण्यात येत असे. या धान्याच्या रक्षणासाठी पूर्वीच्या काळी राजा व प्रजा झटत असे. कारण धान्य असले तर जगता येईल. अन्यथा नाही. हे त्यांना माहित होते. म्हणून धान्याला सोन्याची उपमा दिली जात असे. वर्षाकाल संपताच राजा प्रजाजनांबरोबर गावाच्या सीमेपर्यंत जाऊन नविन धान्य घरात आणत असे.

Monday, September 24, 2012

वायपर बेटाबाबत सावधगिरी हवी


अंदमान-निकोबार द्वीपसमूहातील वायपर बेटाचा भाडेतत्वावर देण्याचा निर्णय वाचून धक्काच बसला. एका मलेशियन हॉटेल कंपनीला व्यवसायासाठी ठराविक रकमेने भाडेतत्वावर वायपर बेट देण्याचा तो प्रस्ताव होता. आणि माझ्या मते तो भारतीय सागरी सीमेच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक आहे. काही जण यापलीकडे जाऊन म्हणतात की-
१.तेथील लोकांना रोजगार उपलब्ध होतोय.
अहो, मलेशियन कंपनी ती एकतर आपल्याकडून भाडेतत्वावर बेट घेणार बाहेरील लोकांची घुसखोरी वाढणार अन् आहे ती परिस्थिती आणखी बिकट नाही झाली म्हणजे मिळवले. तसेही ते तेथील किती लोकांना रोजगार देतील? त्यामुळेच माझे असे मत आहे की बाहेर देशातील कोणत्याच हॉटेल व्यावसायिकांना तिथे जागा देऊ नये, त्यामुळे सागरी हद्द सुरक्षेची चिंता अधिक वाढेल.
२.बिगर भारतीय हॉटेलवाल्यांना का जागा देऊ नये?
तिथे अधिक ये-जा असणार ती देशाबाहेरील परदेशस्थ लोकांची. आणि पर्यटन म्हटले की तो मुद्दा येतोच यात गैरही काही नाही शेवटी त्यावरच आपल्या देशाला आर्थिक हातभार लागत असतो व ते गरजेचेही आहे. परंतु तसे करताना कित्येक देशांनी बेटे स्वतःच्या जोरावर विकसित करून पर्यटनास चालना देण्यासोबत तेथील मूळ लोकांना रोजगार उपलब्ध करून दिले आहेत. तर मग आपणही तसे का करू नये? आपण जेव्हा स्वतःसाठी काही करतो  तेव्हा आपल्या बांधवांचा विचार आपण करणे व बाहेरील लोकांनी तसा विचार करणे यात फरक नाही का?  सुदैवाने आपल्या देशात संशोधक, उद्योजक आणि विचारवंतांची कमी नाही अशा विद्वान लोकांनी एकत्र येवून अंदमानच्या जनतेला विश्वासात घेऊन सुरक्षेला कसलीही बाधा निर्माण होणार नाही यादृष्टीने रोजगारासाठी, प्रगतीसाठी काम करण्यात यावे असे मला वाटते.
३.सुरक्षा...सुरक्षा काय हे जास्त नाही होते का?
जास्त..?? सोमालियन चाचे अगदी मुंबईजवळ येऊन दहशत पसरवत आहे त्यांचा प्रतिबंध तुम्ही करू शकला आहात काय? आणि हे मी नव्हे गेल्या १० वर्षांतील सागरी चाच्यांनी वाढवलेल्या साम्राज्याची आकडेवारी बोलतेय. सागरी सुरक्षा बळकट असणे किती महत्वाचे आहे याचा प्रत्यय आपण मुंबई हल्ल्यात घेतला आहेच. सर्वलष्करी सामर्थ्य असून देखील देशाच्या आर्थिक राजधानीत घातलेला हैदोस आपण विसरू शकत नाही. दुसरीकडे आपल्या शेजारील देश सागरी सीमा सुरक्षित करण्याच्या दृष्टीने सागरी बेटे विकत घेण्याची स्पर्धा करीत आहेत. आणि आपण आहेत ती सुरक्षित करणे सोडाच त्यांनाच भाड्याने द्यायला निघालो आहोत. भाडेतत्वावर देण्याचा निर्णय घेणारेच न जाणो उद्या तेच विकायचाही निर्णय घेतील.
 “आधी सागरी सीमा सुरक्षित करून घ्या; कारण हिंदुस्थानवर तेथूनच हल्ला होण्याची शक्यता अधिक आहे”, असे  पूर्वी स्वातंत्रवीर सावरकरांनी सांगितले नव्हते काय? या महात्म्याने आपल्याला सावध केले होतेच आणि तसे न करून वेळोवेळी आपण त्याचा प्रत्ययही घेतला आहेच. तेव्हा आधुनिक, सर्व सोयींनी परिपूर्ण सुसज्ज असा सागरी लष्करी तळ उभारणे हे भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने गरजेचे आहे. आणि पुढाऱ्यांनी कोणताही निर्णय घेण्याआधी हे लक्षात घ्यायला हवे की- ते घेणाऱ्या कोणत्याही निर्णयाचे दूरगामी परिणाम आपल्याच येणाऱ्या पिढ्यांना भोगावे लागणारे आहेत. मग ते चांगले असोत वा वाईट.

 लेखक :- चेतन होले.
(म.टा. वृत्तपत्रातून दिनांक-२३-०९-१२ रोजी प्रकाशित.)