Popular Posts

Monday, September 24, 2012

वायपर बेटाबाबत सावधगिरी हवी


अंदमान-निकोबार द्वीपसमूहातील वायपर बेटाचा भाडेतत्वावर देण्याचा निर्णय वाचून धक्काच बसला. एका मलेशियन हॉटेल कंपनीला व्यवसायासाठी ठराविक रकमेने भाडेतत्वावर वायपर बेट देण्याचा तो प्रस्ताव होता. आणि माझ्या मते तो भारतीय सागरी सीमेच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक आहे. काही जण यापलीकडे जाऊन म्हणतात की-
१.तेथील लोकांना रोजगार उपलब्ध होतोय.
अहो, मलेशियन कंपनी ती एकतर आपल्याकडून भाडेतत्वावर बेट घेणार बाहेरील लोकांची घुसखोरी वाढणार अन् आहे ती परिस्थिती आणखी बिकट नाही झाली म्हणजे मिळवले. तसेही ते तेथील किती लोकांना रोजगार देतील? त्यामुळेच माझे असे मत आहे की बाहेर देशातील कोणत्याच हॉटेल व्यावसायिकांना तिथे जागा देऊ नये, त्यामुळे सागरी हद्द सुरक्षेची चिंता अधिक वाढेल.
२.बिगर भारतीय हॉटेलवाल्यांना का जागा देऊ नये?
तिथे अधिक ये-जा असणार ती देशाबाहेरील परदेशस्थ लोकांची. आणि पर्यटन म्हटले की तो मुद्दा येतोच यात गैरही काही नाही शेवटी त्यावरच आपल्या देशाला आर्थिक हातभार लागत असतो व ते गरजेचेही आहे. परंतु तसे करताना कित्येक देशांनी बेटे स्वतःच्या जोरावर विकसित करून पर्यटनास चालना देण्यासोबत तेथील मूळ लोकांना रोजगार उपलब्ध करून दिले आहेत. तर मग आपणही तसे का करू नये? आपण जेव्हा स्वतःसाठी काही करतो  तेव्हा आपल्या बांधवांचा विचार आपण करणे व बाहेरील लोकांनी तसा विचार करणे यात फरक नाही का?  सुदैवाने आपल्या देशात संशोधक, उद्योजक आणि विचारवंतांची कमी नाही अशा विद्वान लोकांनी एकत्र येवून अंदमानच्या जनतेला विश्वासात घेऊन सुरक्षेला कसलीही बाधा निर्माण होणार नाही यादृष्टीने रोजगारासाठी, प्रगतीसाठी काम करण्यात यावे असे मला वाटते.
३.सुरक्षा...सुरक्षा काय हे जास्त नाही होते का?
जास्त..?? सोमालियन चाचे अगदी मुंबईजवळ येऊन दहशत पसरवत आहे त्यांचा प्रतिबंध तुम्ही करू शकला आहात काय? आणि हे मी नव्हे गेल्या १० वर्षांतील सागरी चाच्यांनी वाढवलेल्या साम्राज्याची आकडेवारी बोलतेय. सागरी सुरक्षा बळकट असणे किती महत्वाचे आहे याचा प्रत्यय आपण मुंबई हल्ल्यात घेतला आहेच. सर्वलष्करी सामर्थ्य असून देखील देशाच्या आर्थिक राजधानीत घातलेला हैदोस आपण विसरू शकत नाही. दुसरीकडे आपल्या शेजारील देश सागरी सीमा सुरक्षित करण्याच्या दृष्टीने सागरी बेटे विकत घेण्याची स्पर्धा करीत आहेत. आणि आपण आहेत ती सुरक्षित करणे सोडाच त्यांनाच भाड्याने द्यायला निघालो आहोत. भाडेतत्वावर देण्याचा निर्णय घेणारेच न जाणो उद्या तेच विकायचाही निर्णय घेतील.
 “आधी सागरी सीमा सुरक्षित करून घ्या; कारण हिंदुस्थानवर तेथूनच हल्ला होण्याची शक्यता अधिक आहे”, असे  पूर्वी स्वातंत्रवीर सावरकरांनी सांगितले नव्हते काय? या महात्म्याने आपल्याला सावध केले होतेच आणि तसे न करून वेळोवेळी आपण त्याचा प्रत्ययही घेतला आहेच. तेव्हा आधुनिक, सर्व सोयींनी परिपूर्ण सुसज्ज असा सागरी लष्करी तळ उभारणे हे भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने गरजेचे आहे. आणि पुढाऱ्यांनी कोणताही निर्णय घेण्याआधी हे लक्षात घ्यायला हवे की- ते घेणाऱ्या कोणत्याही निर्णयाचे दूरगामी परिणाम आपल्याच येणाऱ्या पिढ्यांना भोगावे लागणारे आहेत. मग ते चांगले असोत वा वाईट.

 लेखक :- चेतन होले.
(म.टा. वृत्तपत्रातून दिनांक-२३-०९-१२ रोजी प्रकाशित.)

No comments:

Post a Comment