Popular Posts

Friday, January 31, 2014

मोल संस्कारांचं

दिनांक: ११-६-२०१३ रोजी, सकाळ-पुणे टुडे येथे प्रकाशित.

Thursday, February 21, 2013

स्वामी विवेकानंदांच्या नजरेतून “भारतीय स्त्री”

यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः |
यञैतास्तु न पूज्यन्ते सर्वास्वत्राफलाः क्रियाः ||
स्त्रियांकडे आदराने पाहिले जात नाही, निरानंदवृत्तीने जेथे स्त्रिया जीवन कंठतात. त्या घराची, त्या देशाची उन्नती होणे कधीही शक्य नाही. म्हणूनच आधी त्यांची उन्नती घडवून आणली पाहिजे.
‘ज्या देशात स्त्रियांना योग्य सन्मान मिळतो आणि त्यांच्या सर्वांगीण विकासास अनुकूल वातावरण निर्माण करण्यात येते तोच देश प्रगतीपथाकडे वाटचाल करत सर्वोत्तम स्थानी विराजमान होत असतो.’ हे सत्य आहे..त्रिकालाबाधित सत्य..!! केवळ पुरुषांना सुशिक्षित करून व विविध संधी प्रदान करून आणि स्त्रियांना दुर्लक्षित ठेऊन कोणताही समाज प्रगती साधू शकत नाही. ज्याप्रकारे “पक्षी एका पंखाच्या साह्याने उडू शकत नाही, त्यासाठी त्याला दोन्ही पंखांची गरज असते” त्याचप्रकारे भारतीय समाजाला गतिमान बनवायचे असेल तर पुरुषांइतकेच स्त्रियांनादेखील शिक्षित करणे आवश्यक आहे. आपण आपल्या देशाच्या गेल्या ५००० वर्षांच्या इतिहासाचा अभ्यास करतो तेव्हा आपल्या समाजातील स्त्रियांच्या स्थानांच्या अनेक बदलत्या अवस्था दिसून येतात. आरंभीच्या वैदिक काळात त्यात पूर्णपणे समानता आढळते. नंतर सरंजामशाहीचा काळ आला, परकीय आक्रमणे झाली, स्त्रियांचे स्वातंत्र संकुचित होत गेले आणि आता ते सर्व संपले आहे.
ज्या हिंदुस्थानात सीता निर्माण झाली- त्या समाजाची स्त्रियांबद्दल जी आदराची, श्रद्धेची भावना आहे तिला जगात कुठेही तोड नाही असे असताना आपल्या स्त्रीवर्गापुढे अजूनही अनेक समस्या आहेत; आणि या समस्या देखील अत्यंत गुंतागुंतीच्या व जटिल आहेत. पण त्याचबरोबर ‘शिक्षण’ या मंत्राने सुटणार नाही अशी एकही समस्या नाही. या हिंदुस्थानात, सीता-सावित्रीच्या देशात, या पुण्यक्षेत्र भारतात अध्यापही स्त्रियांचे चारित्र्य, स्नेह, सेवाभाव, दया, संतुष्ट वृत्ती आणि भक्ती हे गुण जसे पाहावयास मिळतात तसे पृथ्वीवर कोठेही दिसत नाहीत. पाश्चात्यदेशातील स्त्रियांना पाहून पुष्कळदा त्या स्त्रिया आहेत असे वाटतच नाही, त्या पुरुषांच्या बरोबरीने सर्व प्रकारची कामे करतात, वाहने चालवितात, ऑफिसात रात्री-अपरात्री चाकरी करतात फक्त भारतातील स्त्रियांची लज्जा, विनय वगैरे पाहून डोळे तृप्त होतात. त्यांच्यात इतके गुण असूनदेखील आपण त्यांची अध्याप प्रगती साधू शकलो नाही, त्यांना ज्ञानाचा प्रकाश देण्याचा प्रयत्न केला नाही. यथार्थ शिक्षण मिळाल्याने त्या आदर्श नारी होऊ शकतील. केवळ पूजापद्धती शिकवूनच भागणार नाही, सर्व विषयांत त्यांचे डोळे उघडले पाहिजेत. धर्म, कला, विज्ञान, गृहकार्य, स्वयंपाक, शिवणकला, शरीरविज्ञान या सर्व विषयांचे ठोकळ ज्ञान स्त्रियांना देणे उचित होय. विद्यार्थिनींच्या दृष्टीसमोर नेहमी आदर्श स्त्रियांची चरित्रे ठेऊन उच्च त्यागाच्या व्रताविषयी त्यांच्या मनामध्ये भाव निर्माण केला पाहिजे. ज्याप्रकारचे शिक्षण सध्या प्रचिलित आहे त्याप्रकारचे नव्हे तर यथार्थ शिक्षण त्यांना द्यावयास हवे. त्याने स्वावलंबी होऊन स्वतःचे प्रश्न सोडविण्यास, बुद्धीचा विकास करण्यासोबतच मनःशक्ती वाढविण्यास मदत होईल. आपल्या मुली दुबळेपणाच शिकत आल्या आहेत. थोडे काही झाले तर रडण्याशिवाय दुसरे काही सुचत नाही त्यांना. थोडे वीरत्वसुद्धा आवश्यक आहे. थोर निर्भय स्त्रियांची जी भारतात वाण आहे ती अशा शिक्षणानेच दूर होईल आणि संघमित्रा, लीलावती, आहिल्याबाई, मीराबाई यांची परंपरा पुढे चालेल. पाहा बरे, झाशीची राणी कशी होती ! किती महान होती ! किती तेजस्वी होती !
तंत्र म्हणतात-
“कन्याप्येवं पालनीया शिक्षणीयातियत्नतः|”
मुलांना ज्याप्रमाणे वयाच्या तीस वर्षेपर्यंत ब्रम्हचर्यपूर्वक विद्या शिकवावयाची तशी मुलींनाही शिकवली पाहिजे.
बालविवाह ही अत्यंत घृणास्पद गोष्ट आहे. त्यामुळेच आपल्याला अतिशय कष्ट भोगावे लागले आहेत आणि या महापापामुळे आपल्या राष्ट्रालाही धक्के खावे लागत आहेत. अशा परिस्थितीत जर कोणी उघडपणे किंवा अप्रत्यक्षपणे अशा आसुरी प्रवृत्तीचे समर्थन करीत असेल तर ते निश्चितच दुखःदायक आहे. ही प्रथा पूर्णपणे गाडून टाकण्याचा आपण शक्य तितका प्रयत्न केलाच पाहिजे. विधवांचा विवाह होऊ शकत नाही असे मानणारे काही जण अजूनही आहेत. मी त्यांना सांगू इच्छितो की- ‘जुने धर्मग्रंथ आणि नवे धर्मग्रंथही विधवांना पुनः लग्न करण्याची मनाई करत नाहीत; त्यांत या गोष्टींवर प्रतिबंध आहे ही कल्पनाच चुकीची आहे. त्यात पुनर्विवाहास मुभा आहे, जशी पुरुषांना तशीच स्त्रियांनाही.
कोण्या एका संस्कृत कवीने म्हटले आहे,
“न गृहं गृहमित्याहुर्गुहिणी गृहमुच्यते”
-घराला घरपण येते ते गृहिणीमुळे, नुसत्या घराला काही किमंत नाही.
आधुनिक भारतीय एक नवीनच प्रश्न निर्माण करीत आहेत; ते म्हणतात- जन्माची जोडीदारीण निवडण्याबाबत आम्हाला पूर्ण स्वातंत्र हवे, कारण ज्या विवाहावर आमच्या उभ्या जन्माचे सुख-दुःख अवलंबून आहे तो आम्ही स्वतंत्रपणे आमच्या इच्छेनुसार करणार; तर दुसरीकडे प्राचीन भारत आदेश देतो- ‘विवाह हा काही इंद्रियसुखासाठी नाही, विवाहाचा उद्देश आहे सुप्रजोत्पादन. विवाहाबद्दल या देशाची हीच धारणा आहे. प्रजोत्पादानाद्वारे समाजाचे भाविकल्याण-अकल्याण घडविण्याची जबाबदारी तुमच्यावर असते. म्हणून ज्या पद्धतीने विवाह केल्यास समाजाचे अधिक कल्याण होण्याचा संभव असतो तीच समाजात प्रचलित व्हावयास हवी. बहुसंख्य समाजाच्या सुखासाठी तुम्ही स्वतःच्या वैयक्तिक सुखेच्छेचा त्याग करण्यास हवा.’
पाश्चात्यांनी केलेल्या टीकेचा प्रचंड लोंढा, पाश्चात्य स्त्रियांची अवस्था लक्षात घेऊनच आपण आपल्या देशातील स्त्रियांची दशा हीन आहे अशी भावना करून घ्यायला नको. शेकडो वर्षांच्या अनेकानेक विपरीत घटनांचा परिणाम म्हणून स्त्रियांना बंदिस्त करून बाजूला ठेवणे आम्हाला भाग पडले आहे. हे सत्य लक्षात ठेवूनच आपल्या सामाजिक रीतीभातीची पारख आपण करायला हवी. ही पारख करते वेळी “स्त्रीजात हीन” हा सिद्धांताच गृहीत धरून साऱ्या गोष्टींकडे पाहण्याची गरज नाही. पाश्चिमात्यांची आणि हिंदुस्थानची तुलना करायची झालीच तर- “परदेशातील वास्तव्यात समोर पहावे तर विचित्र वाहने, विचित्र पेये, भोजनाचा सुसज्ज थाट, विचित्र वेशभूषा केलेल्या लज्जाहीन विद्वान स्त्रिया, नवीन भावना, राहणीच्या नवीन तऱ्हा या साऱ्या गोष्टी विलक्षण वासना निर्माण करताहेत तर मधेच हे दृश्य लुप्त होऊन व्रत-वैकल्ये, उपासतापास, सीता, सावित्री, तपोवने, भगवी वस्त्रे, समाधी, आत्मानुसंधान ही सारी नजरेसमोर तरळू लागतात.” पाश्चात्य स्त्री स्वतंत्र्य वृत्तीने संचार करणारी आहे म्हणून तिच्यासाठी तेच योग्य; विवाहाच्या बाबतीत पाश्चात्य स्त्री स्वयंवराचा अवलंब करणारी- तिच्या उन्नतीचा तोच प्रशस्त मार्ग. यात संदेहाला जागा आहेच कुठे? पाश्चात्य समाज आणि भारतीय समाज यांच्या मूळ उद्देशांत व आदर्शांत फरक असल्याने, पाश्चात्यांच्या अनुकरणाने जे जे संप्रदाय या देशात निर्माण होतील ते सारेच्या सारे अयशस्वी ठरतील. यावर अधिक विचार केला तर आपण गृहस्थाधर्माबाबत अगदी ठामपणे सांगू शकतो की- अन्य देशांतील रीतीभातींपेक्षा भारतीय रीतीभाती अधिक योग्य व उपयुक्त आहेत. पाश्चात्य समाजाचे अंधानुकरण न करता, त्या समाजात स्त्रियांचे पावित्र्य रक्षण करण्याचे, स्त्रीपुरुषांनी एकमेकांत मिसळण्याचे जे नियम आहेत ते लक्षात न घेताच आपल्या स्त्रियांना पुरुषांबरोबर अनिर्बंधपणे मिसळण्याची जे मोकळीक देतात त्यांच्याबद्दल मला काडीचीही सहानभूती नाही.
“पुरुषांना माझे जे सांगणे आहे तेच मला स्त्रियांनाही सांगावयाचे आहे. भारत व भारतीय धर्म यावर विश्वास-दृढ श्रद्धा असू द्या. सामर्थ्यशाली बना; आशावादी बना. भारतात जन्म झाल्याबद्दल लाज वाटू देऊ नका, तर उलट त्याबद्दल गौरव वाटू द्या; लक्षात ठेवा की भारताने इतर देशांपासून थोडे फार घेण्यासारखे जरी असले तरी जगाला देण्यासारखे, इतर कोणत्याही देशाहून भारताजवळ अधिक आहे.” आणि स्त्रीजातीचा अभ्युदय झाल्याखेरीज भारताचे कल्याण होणे अशक्य !
 लेखक-चेतन होले.

Saturday, February 16, 2013

श्री शिवस्तुती


कैलासराणा शिव चंद्रमौळी | फणींद्र माथा मुकुटी झळाळी
कारुण्यसिंधू भवदु:खहारी | तुजवीण शंभो मज कोण तारी || ||
रवींदु दावानल पूर्ण भाळी | स्वतेज नेत्री तिमिरांध जाळी |
ब्रम्हांडधीशा मदनांतकारी | तुजवीण || ||
जटा विभूती उटी चंदनाची | कपालमाला प्रित गौतमीची
पंचानना विश्र्वनिवांतकारी | तुजवीण || ||
वैराग्ययोगी शिव शूलपाणी | सदा समाधी निजबोधवाणी |
उमाविलासा त्रिपुरांतकारी | तुजवीण || ||
उदार मेरू पति शैलजेचा | श्री विश्वनाथ म्हणती सुरांचा |
दयानिधी तो गजचर्मधारी | तुजवीण || || 
ब्रम्हादि वंदी अमरादिनाथ | भुजंगमाला धरि सोमकांत
गंगा शिरी दोष महा विदारी | तुजवीण || || 
कर्पूरगौरी गिऱिजा विराजे | हळाहळे कंठ निळाचि साजे |
दारिद्र्यदु:खें स्मरणे निवारी | तुजवीण || || 
स्मशानक्रीडा करिता सुखावे | तो देवचुडामणि कोण आहे |
उदासमुर्ती जटाभस्मधारी | तुजवीण || || 
भूतादिनाथ अरि अंतकाचा | तो स्वामी माझा ध्वज शांभवाचा |
राजा महेश बहुबाहुधारी | तुजवीण || || 
नंदी हराचा हरि नंदिकेश | श्रीविश्र्वनाथ म्हणती सुरेश |
सदाशिव व्यापक तापहारी | तुजवीण || १० || 
भयानक भीम विक्राळ नग्न | लीलाविनोदे करि काम भग्न |
तो रुद्र विश्र्वंभर दक्ष मारी | तुजवीण || ११ ||
इच्छा हराची जग हे विशाळ | पाळी सुची तो करि ब्रम्हगोळ |
उमापती भैरव विघ्नहारी | तुजवीण || १२ ||
भागीरथीतीर सदा पवित्र | जेथें असे तारक ब्रम्हामंत्र |
विश्र्वेश विश्र्वंभर त्रिनेत्रधारी | तुजवीण || १३ ||
प्रयाग वेणी सकळा हराच्या | पादारविंदी वहाती हरीच्या |
मंदाकिनी मंगल मोक्षधारी | तुजवीण || १४ ||
कीर्ती हराची स्तुती बोलवेना | कैवल्यदाता मनुजा कळेना
एकाग्रनाथ विष अंगिकारी | तुजवीण || १५ ||
सर्वांतरी व्यापक जो नियंता | तो प्राणलिंगाजवळी महंता
अंकी उमा ते गिरिरूपधारी | तुजवीण || १६ ||
सदा तपस्वी असे कामधेनू | सदा सतेज शशिकोटिभानू |
गौरीपती जो सदा भस्मधारी | तुजवीण || १७ || 
कर्पूरगौरी स्मरल्या विसावा | चिंता हरी जो भजका सदैवा |
अंती स्वहीत सूचना विचारी | तुजवीण || १८ ||
विरामकाळी विकळ शरीर | उदास चित्ती न धरीच धीर
चिंतामणी चिंतने चित्तहारी | तुजवीण || १९ || 
सुखवसानें सकळे सुखाची | दु:खवसाने टळती जगाची
देहावसानी धरणी थरारी | तुजवीण || २० || 
अनुहत शब्द गगनीं न माय | त्याचेनि नादे भाव शून्य होय 
कथा निजांगे करुणा कुमारी | तुजवीण ||२१||
शांति स्वलीला वदनी विलासे | ब्रम्हांडगोळी असुनी न दिसे
भिल्ली भवानी शिव ब्रम्हचारी | तुजवीण || २२ || 
पितांबरे मंडित नाभि ज्याची | शोभा जडीत वरि किंकिणीचि
श्रीदेवदत्त दुरितांतकारी | तुजवीण || २३ || 
जिवा-शिवाची जडली समाधी | विटला प्रपंची तुटली उपाधी
शुद्धस्वरे गर्जति वेद चारी | तुजवीण || २४ ||
निधानकुंभ भरला अभंग | पहा निजांगे शिव ज्योतिर्लिंग
गंभीर धीर सुर चक्रधारी | तुजवीण || २५ ||
मंदार बिल्वे बकुलें सुवासी | माला पवित्र वहा शंकरासी
काशीपुरी भैरव विश्र्व तारी | तुजवीण || २६||
जाई जुई चंपक पुष्पजाती | शोभे गळा मालतिमाळ हाती
प्रतापसूर्यशरचापधारी | तुजवीण || २७ || 
अलक्ष्यमुद्रा श्रवणी प्रकाशे | संपूर्ण शोभा वदनी विकासे
नेई सुपंथे भवपैलतीरी | तुजवीण || २८ || 
नागेशनामा सकळा झिव्हाळा | मना जपे रें शिमंत्रमाळा
पंचाक्षरी ध्यान गुहाविहारी | तुजवीण || २९ || 
एकांति ये रे गुरुराज स्वामी | चैतन्यरुपी शिव सौख्य नामी
शिणलो दयाळा बहुसाल भारी | तुजवीण || ३० ||
शास्त्राभ्यास नको श्रुती पढू नको तीर्थासि जाऊ नको |
योगाभ्यास नको व्रते मख नको तीव्रे तपे ती नको
काळाचे भय मानसी धरू नको दृष्टास शंकू नको
ज्याचीया स्मरणे पतीत तरती तो शंभु सोडू नको || ३१ ||

Friday, February 15, 2013

वदनी कवळ घेता

वदनी कवळ घेता.. (जेवणापूर्वीची प्रार्थना)


वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे | सहज हवन होते नाम घेता फुकाचे ||
जीवन करि जीवित्व अन्न हे पूर्ण ब्रम्ह | उदरभरण नोहे जाणिजे यज्ञ कर्म|| ||
जनी भोजनी नाम वाचे वदावे | आतु आदरे गद्य घोषे म्हणावे ||
 हरी चिंतने अन्न सेवीत जावे | तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे || ||
उपासनेला दृढ चालवावे | भूदेव संतासी सदा नमावे |

सत्कर्मयोगे वय घालवावे | सर्वामुखी मंगल बोलवावे || || 
ॐ सह नाववतु | सह नौ भुनक्तु | सहवीर्य करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै || 
|| ॐ शांति: शांति: शांति: ||