Popular Posts

Friday, August 3, 2012

काय झालास तू..?


काय झालास तू..?


            आज विज्ञान,तंत्रज्ञान व दळणवळण या क्षेत्रांत मानवाने नेत्रदीपक अशी प्रगती साधली आहे. या प्रगतीमुळेच आपण ऐशोआरामी जीवन जगात आहोत. मात्र एवढी भौतिक प्रगती साधूनदेखील आपण पूर्णतः सुखी-समाधानी दिसत नाही. उलट ज्याप्रकारे ही जीवघेणी स्पर्धा वाढते आहे तसे तसे नैराश्य, वैफल्य, चिंता इ. आपण स्वतःहून जादा हव्यासापोटी आमंत्रित करत आहोत हे देखील तितकेच सत्य आहे. भ्रष्टाचार, अराजकता, अत्याचार, महागाई यामुळे समाज पोखरला जात असताना यांत्रिकता, गतिमानता, व्यवहारवाद, वैयक्तिक स्वार्थ यांमुळे दिवसेंदिवस माणूस आत्मकेंद्री व संवेदनाशून्य होत चालला आहे. आणि हे सारे घडत असताना मृतुलोकीचे हाडामांसाचे देव समजले जाणारे डॉक्टर तरी यातून कसे सुटतील बरे? अधिक माया जमवून या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी त्यांनीसुद्धा अनैतिकतेला कवटाळलेले दिसते आहे.
    “पोटापुरता पसा पाहिजे, नको पिकाया पोळी
         देणाऱ्याचे हात हजारों, दुबळी माझी झोळी”
या ओळींमध्ये गदिमांनी मानवी विवेकाचे उत्तम वर्णन केले आहे. एकीकडे लाखो असहाय, पिडीत लोकांची सेवा करणे यात स्वतःला वाहून घेणारा अन् त्यासमोर पैशांला दुय्यम स्थान देणारा, अखेरच्या श्वासापर्यंत जनसेवा हीच मनीषा मनी धरून चालणारा डॉ.आमटे यांसारखा व्रतस्थ कार्यकर्ता तर दुसरीकडे पैशांसाठी लाखो स्त्रीभ्रूण हत्या करणारा डॉ.मुंडेसारखा नराधम हे परस्परविरुद्ध वैयक्तिक स्वार्थाच्या टोकाची उदाहरणे होत. मदर तेरेसा यांनी मानवतेच्या भूमिकेतून कोलकाता येथे “होम फॉर द डाईंग” स्थापन करून मृत्युशय्येवर असलेल्या दुःखीतांचे अंतिम क्षण आनंददायी व्हावेत यासाठी प्रयत्न करून गोरगरीब, बेवारशी, रोगपिडीत लोकांची सेवा करण्यात त्यांनी आयुष्य व्यतीत केले. आजची परिस्थिती ‘जीव त्याचाच अनमोल ज्याचा खिसा गरम’ अशी असताना त्यामुळेच की काय उच्चदर्जाच्या सोयी-सुविधा या फक्त ठराविक वर्गाभोवती केंद्रित झालेल्या दिसतात. विशिष्ट प्रांतातील पाच-पंचवीस डॉक्टरांनी एकत्र येऊन भले मोठे पंचतारांकित रुग्णालय बांधायचे अन् जिथे स्वतः वेगळे असताना रुग्णांना आकारणारी फी तिथे सेवेच्या नावाखाली कित्येक पट वाढवायची; मोजक्या शब्दांत सांगायचे झाले तर वातानुकुलीत दुकाने थाटून मोठ्या गिऱ्हाईकाची वाट पाहत नोटा मोजण्यासाठी गल्ल्यावर बसलेले हे पांढरपेशे लुटारू आहेत असे वाटल्यावाचून राहत नाही. डॉ. आनंदीबाई जोशी यांनी तर ही परंपरा “रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा” मानून चालू केली होती मग आज असे काय घडले की  यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे? हा प्रश्न मनात घेऊन मी एका नावाजलेल्या डॉक्टरांकडे गेलो अन् त्यांना त्याबद्दल विचारले तेव्हा त्यांनी दिलेले उत्तर ते असे होते- “समाजाची सेवा करण्यासाठी, त्यांना सोई पुरवण्यासाठी, नवे तंत्रज्ञान वापरून रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी आम्हाला नाईलाजाने(?) ही जादाची दर आकारणी करावी लागते”. परंतु विंचू दंशाची लस शोधून सर्वसामान्य जणांना वाजवी दरात उपलब्ध व्हावी यासाठी तिचे पेटंट नाकारणाऱ्या डॉ. हिम्मतराव बाविसकरांबद्दल मी बोलू लागताच तिथे पसरलेली शांतता कुठे तरी पाणी मुरतेय हे ओरडून सांगत होती.
महागाई, भ्रष्टाचार ही कारणे पुढे करत स्वतःची कपाटे भरण्याचा त्यांचा हा धंदा राजरोसपणे चालू असतो. यातूनही पोट पुरेसे भरत नाही काय म्हणून कुठल्यातरी हेल्थ पॉलीसीच्या नावाखाली लुट करण्यासाठी निरनिराळ्या योजनांची आमिष दाखवायची. पहिलेच हॉस्पिटल म्हटले की सर्वांना धडकी भरते. आपला रुग्ण लवकर बरा व्हावा या काळजीपोटी होणाऱ्या खर्चाचा विचार करीत नाही व तिथेच आपण चुकतो. दुखःद प्रसंगी “खरंच रुग्णाच्या एवढ्या चाचण्या झाल्या का? मी आणून देत असणारी सगळी औषधे, इंजेक्शने वापरली गेली का?” तेव्हा याचा विचारदेखील आपण करत नाही. काय? किती? कसे? वापरले हे देखील संबंधितांना विचारत नाही आणि त्यांनादेखील ते आपण  विचारल्याशिवाय सांगणे आवश्यक वाटत नसावे. यासारख्या कित्येक गोष्टी रुग्णालय प्रशासन दडवून ठेवते. आपण मात्र डॉक्टरांवर पूर्ण विश्वास ठेऊन ते सांगतील ते सर्व गरजेच्या वस्तू आणून परिचारिकांच्या ताब्यात देतो व त्याच ते जसे लागतात तसे वापरतात; ती सारी औषधे रुग्णांपर्यंत पोहचत असतील का? आपल्याला एकतर त्यातले काही कळत नाही अन् कळत असले तरी रुग्ण लवकर बरा व्हावा ह्या काळजीहून अधिक महत्त्वाची, जादा लक्ष देण्यासारखी ती नसल्याने आपण तिकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करतो. कित्येक प्रकारे रुग्णांना फसवून स्वतःचा जास्तीत जास्त फायदा करवून घेण्यात वरपासून खालीपर्यंतचे सारे झटत असतात. आधीच सांगितलेल्या ठराविक रकमेपेक्षा जादाची मागणी करणे; गरजेचे नसताना शस्रक्रियेस भाग पाडणे व करणे, अनावश्यक चाचण्या करवून घेणे ही लुबाडणूक, विश्वासघात नाही तर आणखी काय आहे? या रकमेच्यापोटीच काही महिन्यांपूर्वी पुण्यातील एका रुग्णालयाने तान्ह्याबाळाला त्याच्या पालकांकडे देण्यापासून रोखले होते हे आपण जाणतो. रुग्णालयाने पुरवलेल्या सुविधांची आकारणी व्हावी अन् रुग्ण ती देणेही लागतो पण डॉक्टरांवर विश्वास ठेऊन आलेल्या भोळ्याभाबड्या रुग्णांना फसवून नको. सारेच डॉक्टर असे आहेत असे नव्हे परंतु काही आडमुठ्या, स्वार्थी, लालची लोकांकडून  डॉक्टरी पेशाला काळीमा फासला जात आहे. यातूनच मग मारहाणी सारख्या घटना घडतात. डॉक्टरलगेच संघटनांकडे धाव घेतात पराचा कावळा करतात, अन् आपण कसे धुतल्या तांदळासारखे हे माध्यमांद्वारे इतरांना सांगतात पण ज्याने हे अनुभवले आहे त्याने कायद्याचा आधार जरी घेतला तरी किती खोलवर तपास होतो, कारवाई होते हे आपण सारे जाणतोच. माझा या मारहाणीच्या घटनांना पाठींबा आहे असे नव्हे पण प्रकरण पोलिसांकडे गेल्यावर यात भरडला जाणार तो सामान्यच कारण हे सारे उपद्याव करण्याइतपत पैसा असतो कुणाकडे? म्हणून बऱ्याचदा तोंड दाबून बुक्क्यांचा मार खात बसने हेच त्याच्या नशिबी आहे हे तो जाणतो. पण कधी-कधी रागाच्याभरात झालेल्या अन्यायाविरुध्द नाईलाजाने प्रतिक्रिया उमटते अर्थात हे नेहमीच आणि सगळेच करतात असे नव्हे; काही कोर्टात खेट्या मारणारेही आहेत, काही झालेल्या गोष्टींचा अडाणीपणे स्वीकार करणारे आहेत व काही तटस्थपणे या साऱ्याकडे पाहत राहणारेही आहेत. त्यामुळेच भरमसाठ रक्कम आकारणारी मोठाली स्वच्छ, सुसज्ज हॉस्पिटल्स ही कसेबसे पोट भरणाऱ्या गरिबांसाठी नाहीत असे वाटते. पुढे यातूनच उभा राहणारा प्रश्न - “यात चूक कोणाची?” शिक्षणासाठी लाखो रुपयांची देणगी, फी देऊन शिकणाऱ्या अन् ती पुन्हा जनतेकडून वसूल करणाऱ्या डॉक्टरांची? की डोळे झाकून डॉक्टरांवर विश्वास ठेवणाऱ्या रुग्णाची?
            शहरात ही गत आहे तर तिकडे खेडोपाड्यात अन् डोंगरकपारीत राहणाऱ्या लोकांनी चांगल्या सुविधा पोहोचण्याची काय फक्त वाट पाहत राहायची? अशा ठिकाणी जाऊन निस्वार्थ सेवा पुरवण्यास येते कुणी पुढे? उलट अशा ठिकाणी जाण्यास लागू नये म्हणून चिरीमिरी देणारे काही महाभाग आहेत. अन् दुसरीकडे मेळघाटातील आदिवासींमध्ये राहून डॉक्टरी सेवा पुरवण्याचे काम करणारे डॉ.रविंद्र कोल्हे, पिढ्यानपिढ्या आनंदवनला आपल्या जबरदस्त इच्छाशक्तीच्या जोरावर आनंदी ठेवणारे आमटे कुटुंब यांचे कार्य वाखाणण्याजोगे आहे. यांच्यासाठी नाही का महागाई? यांना नाही वाटतं का आपणही चंदेरी दुनियेत जाऊन रहावं? पण यापुढे जाऊन त्यांनी पैशांपेक्षा पिडीतांच्या सेवेला आपले मानले आहे.
                                                जे का रंजले गांजले त्यांसी म्हणे जो आपुले |
                                                 तोची साधू वोळखावा देव तेथेची जाणावा ||
यात तुकोबारायांनी वर्णिलेल्याप्रमाणे कित्येकांसाठी ते खऱ्या अर्थाने देव आहेत.
धन्वंतरीचा वारसा सांगणाऱ्या डॉक्टरांवर आज आत्मपरीक्षणाची वेळ आली आहे यात शंका नाही. मुठभर नालायकांमुळे सामन्यांच्या मनातील हरवलेले आदराचे स्थान निस्वार्थ रुग्णसेवेच्या माध्यमातून त्यांना पुन्हा मिळवावे लागणार आहे. आणि यासाठीच        “सं गच्छध्वं सं वदध्वं सं वो मनांसि जानातम् देवा भागं यथा पूर्वे..”    (१०-११-२ )
या ऋग्वेदातील मंत्रात सांगितल्याप्रमाणे मनाने व विचाराने  एक होण्यासाठी उच्च शिक्षणासोबतच उच्च नीतिमूल्ये आणि नैतिकतेचा संगम घडवून आणणे हे महत्वाचे आहे. आणि हे जर आपल्याला साध्य झाले तरच रुग्ण व डॉक्टरांमधील बंधुभाव, सहकार्य, विश्वासाचे  नाते पुनः निर्माण होण्यास मदत होईल.

लेखक:- चेतन  होले.